भूज – भारत सीमेवरील एक इंच जमिनीसाठीही तडजोड करण्यास तयार नाही. देशाच्या सुरक्षेबाबत नागरिकांचा लष्करावर पूर्ण विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील सर क्रीक येथे जवानांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. भारतीय सशस्त्र दलाच्या सजगतेमुळे भारताच्या शत्रूंना त्यांची वाईट योजना निष्फळ ठरल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.
सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा पंतप्रधान मोदींनी यावर्षीही कायम ठेवली. त्यांनी भेट दिलेले ठिकाण भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळ आहे. “केवळ तुमच्यामुळे भारतीयांना सुरक्षिततेची जाणीव होते. जग तुमच्याकडे पाहताना भारताची ताकद पाहते, तर शत्रू त्यांच्या योजना अयशस्वी झाल्याचे अनुभवतात,” असे मोदींनी सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल, वायुदलाच्या जवानांना उद्देशून सांगितले.
पंतप्रधानांनी सांगितले की, आजचे सरकार सीमेवरील संरक्षणाबाबत एक इंचही तडजोड करत नाही. “देशाच्या रक्षणासाठी माझे सरकार लष्कराच्या क्षमतेवर विश्वास ठेवते, शत्रूच्या शब्दांवर अवलंबून राहत नाही,” असे त्यांनी नमूद केले. भारत-चीन करारानुसार डेमचोक आणि डेपसांग या संघर्षबिंदूंवरून दोन्ही देशांच्या लष्कराने माघार घेतली असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चार वर्षांचा संघर्ष संपुष्टात आला आहे.
सीमावर्ती भागांतील पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. विकसित भारताच्या दिशेने आपण झपाट्याने पुढे जात असून जवान त्या स्वप्नांचे रक्षक आहेत, असे मोदी म्हणाले. कच्छमधील पर्यटनाच्या अपार क्षमता आणि सीमा पर्यटनाच्या सुरक्षेतील महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.