Headlines

शेअर ट्रेडिंग च्या नावाखाली मलकापूरच्या शिक्षकाची लाखांनी फसवणूक, आरोपीला पालघर जिल्ह्यातून अटक!

बुलढाणा :- ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली लाखो रुपये उकळून शिक्षकाची फसवणूक झाल्याचा प्रकार मार्च महिन्यात मलकापूर येथे उघडकीस आला होता. या प्रकरणी सायबर पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी एका भामट्याला अटक केली.

शैलेंद्र लक्ष्मण गुळवे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यावरून, अज्ञात ठगबाज आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सदगीर यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. सुनिर सुरेश वैगणकर (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, वसई (जि. पालघर) येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे तीन स्मार्टफोन, विविध बँकांचे पाच एटीएम कार्ड, असे साहित्य आढळून आले.
सायबर ट्रेडिंगच्या नावाखाली आरोपी सामान्य नागरिकांची फसवणूक करत होता. नवी बँक खाती उघडून तो मुख्य सूत्रधारास माहिती पाठवत असल्याचे यावेळी पोलिसांना समजले. आरोपीला मलकापुर न्यायालयात हजर केले असता १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. इतर आरोपीचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी महामुनी, अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या नेतृत्वात हवालदार शकील खान, पोलीस नाईक राजदीप वानखेडे, विक्की खरात, क्षितीज तायडे यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *