वडनेर भोलजी : – सिमेंट खरेदीसाठी पैसे मागण्याच्या बहाण्याने एका तरुणाची २६ हजार रुपयांची फसवणूक करून अज्ञात चोरटा पसार झाल्याची घटना ५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता वडनेर भोलजी येथे घडली.
याप्रकरणी प्रशांत गोविंदा जुमडे (वय २५, रा. वडनेर भोलजी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या हॉटेलमध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तीने सिमेंटसाठी ६ हजार रुपये मागितले. विश्वास बसावा म्हणून त्याने फिर्यादीच्या बहिणीला सांगितले की, भाऊने सिमेंटसाठी पैसे द्यायचे आहेत. मात्र, बहिणीने पैसे देण्यापूर्वी भावाला फोन करण्यास सांगितले. यावेळी चोरट्यानेच बनावटी फोन करून भावाशी बोलण्याचे नाटक केले आणि फोन व्यस्त असल्याचे भासवले. तोपर्यंत फिर्यादीची बहीण पैसे घेऊन आली होती. संधी साधून चोरट्याने ते पैसे हिसकावले आणि त्याच्यासोबत आणलेल्या डब्यातील २० हजार रुपये घेऊन पसार झाला. फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर ८ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार चिखलकर करीत आहेत.