शेगाव – शेगाव-पातुर्डा मार्गावर सोमवारी सकाळी धावणारी एस.टी. बस (MH-40 Y-5395) अचानक स्टीअरिंग बिघडल्याने रस्त्याच्या कडेला घसरली. सुदैवाने बस निंबाच्या झाडावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून, २५ प्रवाशांचा जीव संकटात सापडला होता.
अपघातात नारायण सम्रत वानखडे (८५) आणि मोहम्मद फिरोजोद्दीन कुतुबोद्दीन (५४, दोघे रा. पातुर्डा) किरकोळ जखमी झाले, तर वाहक पटोकार यांच्या पायाला दुखापत झाली. घटनास्थळी गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन सर्व प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेनंतर महिलांसह अनेक प्रवाशांनी भीती व्यक्त करत एस.टी. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला. शेगाव आगाराच्या अनेक बसेस तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट अवस्थेत असल्याचे वारंवार निदर्शनास येत असून, या नादुरुस्त बसेस ग्रामीण भागात धावत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार आणि एस.टी. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.
स्टीअरिंग बिघडले, एस.टी. बस रस्त्यावरून घसरली; तिघे जखमी नादुरुस्त बसेसचा धोका कायम; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष?
