मलकापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी नूतन इंग्लिश स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी भरलेला कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशभक्तीचा आणि आदर्श जीवनमूल्यांचा संदेश देत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींनी वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे यांच्या हस्ते गांधीजी व शास्त्रीजींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी गांधीजींचे अहिंसेचे तत्त्व, सत्याचा मार्ग आणि शास्त्रीजींचे साधेपण तसेच देशसेवेवरील त्यांचे विचार यावर आधारित भाषणे सादर केली. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, पोवाडा आणि लघुनाटिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. मुख्याध्यापक खर्चे यांनी आपल्या मनोगतात गांधीजींचे अहिंसेचे तत्त्व आणि शास्त्रीजींचे “जय जवान जय किसान” हे घोषवाक्य आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम पोरवाड मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. अश्विनी बगाडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.