मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) : भाडगणी गावातील बसस्टँड ते अविनाश जाधव यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे निवेदन दिले आहे. एकनाथ जाधव व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले.
सदर रस्त्यावर काही ठिकाणी जनावरे व म्हशी बांधल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “हा रस्ता सरकारी असून कोणाच्याही खाजगी मालकीचा नाही. त्यामुळे त्वरित रस्ता मोकळा करून द्यावा व अडथळे दूर करावेत,” अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या रस्त्याने दररोज अनेक शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांची वर्दळ असते. विशेष म्हणजे या रस्त्यावरून ४ ग्रामपंचायत सदस्यांची घरे असूनदेखील रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन रस्ता सोयीस्कर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाडगणी ग्रामपंचायतीकडे गावकऱ्यांचे निवेदन; रस्ता दुरुस्ती व जनावरे हटविण्याची मागणी
