मलकापूर (दिपक इटणारे): मलकापूर नगराध्यक्ष पद मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षातील अनेक इच्छुकांमध्ये माजी नगरसेवक तथा काँग्रेस गटनेते राजेंद्र वाडेकर यांचे नाव सध्या नागरिकांच्या चर्चेत अग्रस्थानी आहे.
राजकीय पातळीवर केवळ वादविवाद करणाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष जनतेच्या अडचणी सोडवणारे, संकटात धाव घेणारे आणि पाठीशी उभे राहणारे नेते म्हणून वाडेकर यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चार टर्म नगरसेवक म्हणून त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये नेतृत्व दाखवले असून, त्यांच्या राजकारणातील तगड्या अनुभवाला मलकापूरवासी मान्यता देतात. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेपासून पारपेठला जोडणारा मोठा पूलनिर्माण, पाणी पुरवठा विभागाच्या नवीन साठवण टाक्या ,रस्त्यांवरील प्रकाशव्यवस्था, तसेच नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे, अशा अनेक कामामध्ये वाडेकर यांचा मोलचा वाटा आहे.विविध विकसित कामा मधून एक जबाबदार नेतृत्वाची जाणीव जनतेला झाली आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरात अनेक नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना प्रभावित भागातील जनतेला मदतीचा हात देऊन त्यांचे सानुग्रह अनुदान मिळवून मनोधैर्य वाढविण्याचे काम केले होते. तर दुसरी कडे अनेक नेते फोटोसेशनमध्ये व्यस्त होते. त्यावेळी राजेंद्र वाडेकर प्रत्यक्ष मैदानात उतरून मदतकार्य करत होते. त्यांचा हा संवेदनशील आणि कामाशी बांधिलकी ठेवणारा स्वभाव नागरिकांना भावला आहे. वाडेकर हे बोलण्यापेक्षा कामाला प्राधान्य देणारे, सर्वसामान्यांशी थेट संपर्कात राहणारे आणि प्रत्येक सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रमात अग्रणी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि सर्व सामान्य नागरिकाच्या मनात राजेंद्र वाडेकर नगराध्यक्ष म्हणून प्रथम पसंती देत आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या बहुतांश नेत्यांना अडीच ते पाच वर्षांपर्यंत सत्तेची संधी मिळाली, मात्र वाडेकर यांना आजवर नगराध्यक्ष पदाची संधी मिळालेली नाही. तरीही त्यांनी सेवाजेष्ठता, प्रशासकीय कामकाजाचा दांडगा व प्रदीर्घ अनुभव, काम करण्याची हतोटी आणि नागरिकांशी कायम जोडलेली नाळ या गुणांमुळे जनतेच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. साधारण कुटुंबातून आलेला हा जमिनीशी नाळ जोडलेला कार्यकर्ता आज काँग्रेसचा विश्वासार्ह, स्वच्छ प्रतिमा असलेला चेहरा ठरू शकतो. पक्षाला सध्या गरज आहे ती अशाच एका अनुभवी, लोकाभिमुख आणि कार्यक्षम नेतृत्वाची. अशा परिस्थितीत राजेंद्र वाडेकर हे काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरू शकतात, असा नागरिक विश्वास व्यक्त करीत आहे.