बुलढाणा :- जिल्ह्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुग्धजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. नुकतीच, नांदुरा येथे भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून १४९ किलो खवा जप्त करण्यात आला.
दिवाळीत मिठाई आणि गोडधोड पदार्थ तयार करण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु, या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. यामुळे भेसळ नियंत्रण समितीने जिल्हाभर तपासणीची कार्यवाही सुरू केली आहे.
या मोहिमेत दूध, मिठाई, खाद्यतेल, तूप, फरसाण, रवा, आणि बेसन यांसारख्या पदार्थांचे २२ नमुने मलकापूर, नांदुरा, सिंदखेड राजा, आणि देऊळगाव राजा येथून घेण्यात आले. ही तपासणी अन्न सुरक्षा अधिकारी जी.के. वसावे आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ. डी.एन. काळे यांच्या मार्गदर्शनात नांदुरा रेल्वेस्थानक परिसरात करण्यात आली.