नागपूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) जिल्ह्यातील कुही तालुक्यात हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, अभियानांतर्गत २४ सप्टेंबर रोजी १०० झाडांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम कुही होमगार्ड पथकाने राबवला. वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण कार्यालय कुही मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका, सावंगी पचखेडी येथून विविध प्रकारची झाडे आणण्यात आली. जांभूळ, करंजी, कडुलिंब, शिताफळ, आवळा, जांब, बेहळा, बदाम, बेल, तसेच ऑस्ट्रेलियन आणि कॅशिओ बांबू अशा विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला मा. जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, केंद्र नायक दीपेश जवादे, प्रशासकीय अधिकारी अनिल यादव, पोलीस निरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक इंगोले, गोपाले आणि अरुण मेहर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या उपक्रमात कुही होमगार्ड पथकातील अधिकारी, महिला व पुरुष होमगार्ड कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या यशस्वी कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक अधिकारी मनोज बारसागडे तसेच पथकातील राजू बोरकर, विकास कावळे, नारायण शेंडे, मुकुंदा वाल्दे, वासुदेव मेहर, धनराज पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली.
