मोताळा : – बोराखेडी शिवारातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलगी फूस लावून पळविण्यात आल्याची घटना ४ एप्रिल रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी कुर्हा काकोडा येथील आकाश चौफे याच्याविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील एक महिला आपल्या कुटुंबासह बोराखेडी शिवारातील वीटभट्टीवर मजुरीचे काम करते. ३ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता ती कुटुंबासह झोपली असता, ४ एप्रिलच्या पहाटे दीडच्या सुमारास त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा अचानक शोध लागला नाही. नातेवाईकांकडे तसेच परिसरात शोध घेऊनही मुलगी आढळून आली नाही.
याबाबत संबंधित महिलेनं बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तिच्या तक्रारीवरून आकाश चौफे याने मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.