चिखली:- तालुक्यातील पळसखेड जयंती शेतशिवारातील दिलीप राजाभाऊ खरात यांच्या गोठ्यावर लांडग्याने रात्रीच्या सुमारास हल्ला चढवीत बांधलेल्या आठ बकऱ्यांना ठार केल्याची घटना २९ मे च्या सकाळी उघडकीस आली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पळसखेड जयंती शिवारातील गट नं. ११७ मधील दिलीप राजाभाऊ खरात यांनी त्यांच्याकडील आठ बकऱ्या नेहमीप्रमाणे आपल्या गोठ्यात बांधल्या होत्या. २८ मेच्या रात्री लांडग्याने गोठ्यावर हल्ला चढवून त्यात बांधलेल्या आठही बकऱ्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी खान आणि तलाठी भुसारी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे. तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश गाडे यांनी मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन केले. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्याने शासनाकडून मदत मिळण्याची मागणी केली आहे.