मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) नांदुरा-मलकापूर तालुक्यात दि. 15 व 16 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना, करणी सेना आणि युवा भीम सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, काही मंडळातील पर्जन्यमापन यंत्रे खराब असल्याने खरी पावसाची नोंद कमी दाखवली जात आहे. सोयाबीन पिकावर हुमनीअळी आणि येलो मोझॅक यांसारखे गंभीर रोग आले असून काही शिवारात सर्वेक्षण अद्याप झालेले नाही किंवा चुकीच्या पद्धतीने झाले आहे. काही बियाण्यांना शेंगा न लागल्याने उत्पादनात 100% घट होणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. यामुळे नांदुरा व मलकापूर तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत, तसेच सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन एस.डी.ओ. साहेब, तहसीलदार मलकापूर व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, नांदुरा तालुका अध्यक्ष चरणसिंग राजपूत, करणी सेनेचे मलकापूर शहर अध्यक्ष अमरदीपसिंह ठाकूर, युवा भीमसेनेचे वैभव वानखेडे, अक्षय राजपूत आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
