Headlines

वादळी वाऱ्याने मलकापूर शहरासह तालुक्याला झोडपले; भिंत कोसळवून 12 मजूर जखमी, बसवर वीज कोसळली, मंदिराचा कळस पडून एकाचा मृत्यू, एकाच्या डोक्यावर झाड पडून मृत्यू, शहर पोलीस स्टेशनचे पत्रे उडाले

मलकापूर: विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूरात आज रविवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे अनेक घर व दुकानांची टिनपत्रे उडाली ‌झाडांच्या फांद्या पडल्या त्यामुळे रहदारी विस्कळीत झाली. तब्बल ४० मिनिटांच्या थरारात नागरिक अक्षरशः हादरले. पावसाळ्याची सुरुवात व्हायची आहे पण मान्सून सक्रिय झाल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्याच दोन दिवसांपूर्वी तुरळक पाऊस झाला होता. मात्र आज रविवारी सायंकाळी ६.४० मिनिटांनी वातावरणात अचानक बदल झाला. अन् विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागली. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले.

शहरात मुक्ताईनगर रोड, नांदुरा रोड व बुलढाणा रोडवरील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी रहदारी विस्कळीत झाली होती. रविवारी सायंकाळी अचानक आलेले वादळ जणूकाही चक्रीवादळ असल्याच दिसून आले. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता कि रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. माणसाला माणूस दिसेनासा झाल्याने तब्बल ४० मिनिटांचा थरार नागरिकांनी अनुभवला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, शहरातील वेगवेगळ्या भागात घरांची प्रामुख्याने जुन्या घरांची पडझड झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक घरांवरील व दुकानांवरील टिनपत्रे अक्षरशः उडाल्याने एकच खळबळ उडाली होती. अनेक भागात झाडे पडल्याने लोकांना चांगलाच हादरा बसला आहे.

ग्रामीण भागात पण फटका…!

मलकापूर शहरातील वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला.त्याच पध्दतीने रविवारी सायंकाळी ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड व टिनपत्रे उडाली आहेत. धरणगांव -धोपेश्वर रस्त्यावर अनेक झाडे पडल्याने रहदारी ठप्प पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

भिमनगरात शिवमंदिराचा खांब कोसळला एक ठार

मलकापूर: येथील भिमनगरात विजेच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात पुरातन शिवमंदिराचा खांब कोसळला. त्यात ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मलकापूरात आज रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्यात येथील भिमनगरात असलेल्या पुरातन शिवमंदिराचा खांब कोसळला. त्याचा मलबा डोक्यावर पडल्याने स्थानिक रहिवासी रविंद्र विश्राम निकम वय ४५ हे गंभीररीत्या जखमी झाले.
पाऊस थोडा कमी झाल्यानंतर समतेचे निळे वादळ संघटना अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक तरूणांनी गंभीर जखमीला तत्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर शर्थीचे उपचार करण्यात आले. मात्र डोक्यात गंभीर दुखापत झाली असल्याने रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रविंद्र निकम यांचा मृत्यू झाला आहे. तहसीलदार राहुल तायडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

@ मलकापूर तालुक्यातील ग्राम बेलाड येथील रहिवासी निवृत्ती घनसाराम इंगळे वय 64 वर्षीय इसमाच्या डोक्यावर झाड कोसळू जागीच मृत्यू झाला आहे.

@हरिओम जिनींग कोसळला १५ कामगार बालंबाल बचावले

मलकापूर: विजेच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात राष्ट्रीय महामार्गावरील हरिओम जिनींग फॅक्टरी कोसळली. आज रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत तब्बल १५ कामगार बालंबाल बचावले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर हरिओम जिनींग फॅक्टरीत असंख्य कामगार काम करतात. आज रविवारी १५ जण कामांवर कार्यरत होते. आज रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे जिनिंग फॅक्टरी कोसळली. शेड व भिंती कोसळल्याने एकच खळबळ उडाली. कामगारांनी एकच धावपळ केली. त्यामुळे १५ कामगार बालंबाल बचावले आहेत.

@ सभामंडप कोसळला 12 जण जखमी, दोघे अत्यव्यस्त

वादळी वाऱ्यामुळे शहरातील समर्पण लॉन येथील सभा मंडपाचे छत उडाल्याने भिंत कोसळली. यामुळे स्वयंपाक करणाऱ्या 12 मजूर महिला व पुरुष जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

@ अकोल्या वरून मलकापूर कडे येत असलेली एम.एच 07 सी 9217 क्रमांकाच्या बसवर वीज कोसळुन एक महिला कंडक्टर जखमी झाली. तर बस मध्ये असलेले दहा ते पंधरा प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. मलकापूर आगाराची बस आज सायंकाळच्या सुमारास अकोल्यावरून मलकापूर कडे येत असताना आयटीआय कॉलेज जवळ आली असता बसवर वीज कोसळली. या घटनेत बसच्या वरील पत्रा फाटला असून बसचा काच फुटल्याने महिला कंडक्टर च्या हाताला लागून महिला जखमी झाली आली.

@ वादळी वाऱ्या मुळे मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे टिनपत्रे उडाली.

@ बस स्थानकात असलेली होल्डिंग सुद्धा पडून दुर्घटना झाली. त्या ठिकाणी असलेले ऑटो चालक बाल बाल बचावले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *