मलकापूर :- उमेश ईटणारे ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शहरातील बसस्थानक पुन्हा एकदा चोरट्यांचे अड्डे बनले आहे. भाऊबीज साजरी करण्यासाठी निघालेल्या महिलेला मलकापूर बसस्थानकावर मोठा फटका बसला आहे. अज्ञात चोरट्याने तिच्या पर्समधून तब्बल ३ लाख १५ हजार ६३२ रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.ही घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौ. स्वाती विकास संभारे (वय ३९, रा. हनुमान नगर, मलकापूर) या महिला जळगाव ते मेहकर या एस.टी. बसने मूर्ती (ता. मोताळा) येथे भाऊबीज साजरी करण्यासाठी निघाल्या होत्या. मलकापूर बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील ३७.५२० ग्रॅम वजनाची सोन्याची पट्टा पोत (किंमत ₹२,६३,०००) आणि ६.८०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल (किंमत ₹५२,६३२) अशा एकूण ₹३,१५,६३२ रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कौळासे करीत आहेत. दरम्यान बसस्थानकात सुरक्षा व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. ना सीसीटीव्ही कॅमेरे, ना पोलीस गस्त, त्यामुळे चोरट्यांना अक्षरशः मोकळे रान मिळाले आहे. गेल्या काही दिवसांत बसस्थानक परिसरात सलग चोरीच्या घटना घडत असूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
