Headlines

मलकापूर बसस्थानकात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाही; महिलेच्या पर्समधून ३ लाख ४१ हजारांचे दागिने व रोख रक्कम लंपास! चोरट्यापासून प्रवाशांची सुरक्षा कोण करणार?

 

मलकापूर :- ( उमेश ईटणारे ) शहरातील बसस्थानकात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी पोलिसांसमोरच चोरीचा थरार उडवला आहे. बसस्थानकावर पोलीस उपस्थित असतानाही एका महिलेच्या पर्समधून तब्बल ३ लाख ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. विशेष म्हणजे बसस्थानकात एकाही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्यामुळे चोरट्यांना मोकळा वावर मिळाला आहे. घटना २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. शितल तुषार महाजन (वय ३७, रा. गंगानगर, बऱ्हाणपूर) या त्यांच्या मुलगी आयुषी (१३) आणि मामाचा मुलगा वेदांत (६) यांच्यासह मलकापूर बसस्थानकावरून चिखली ते बऱ्हाणपूर या बस (MH-20 GC 2904) मध्ये बसत होत्या. बसमध्ये चढत असतानाच त्यांच्या पर्समधील सोन्याची पट्टा पोत, कानातले, अंगठी, चांदीची चैन आणि रोख ८ हजार रुपये असे एकूण ३,४१,००० रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. महिलेनं तत्काळ बस थांबवण्याची विनंती केली. परंतु बस वाहकाने वाहन थांबवण्यास नकार देत सरळ मुक्ताईनगर बसस्थानकात बस नेली. त्यानंतर पीडित महिलेनं मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान बसस्थानकावर नेहमी पोलीस उपस्थित असतात तरीही अशा चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरट्यांना वाव मिळत असून सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार बसस्थानकात पोलीस असतात पण प्रवाशांच्या सुरक्षेवर कुणाचं लक्ष नाही. चोरट्यांना जणू पोलिसांचा धाक उरलेलाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!