मलकापूर :- ( उमेश इटणारे ) शहरातील रस्त्यांची अवस्था पाहून नागरिकांचा रोष उफाळून आला आहे. गणपती नेत्रालय ते दीपक नगरपर्यंतचा बुलढाणा रोड अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेला आहे. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून आतापर्यंत अनेक जण जखमीही झाले आहेत. याचप्रमाणे चांडक विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचीही परिस्थिती गंभीर आहे. दररोज हजारो विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कधीही मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील इतर अनेक रस्त्यांचीही हीच दयनीय अवस्था असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने नागरिक संतापले आहेत. मुलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरत असलेल्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
