मलकापूर : एकल/विधवा महिलांच्या जीवनात पुन:श्च आनंद निर्माण व्हावा, त्यांनी स्वावलंबी बनावे व स्वत:च्या पायावर उभे रहावे याकरीता गेल्या काही वर्षांपासून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविणार्या एस.के.स्वेअरच्या एन्टरप्रायजेस संचालिका व जनक्रांती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.कोमल सचिन तायडे यांची निवड बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी यांनी मिशन वात्सल्य तालुका समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून आज २२ सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे केली आहे.
मिशन वात्सल्य अंतर्गत तालुकास्तरीय समन्वय समिती शासनाकडून स्थापन करण्यात येत असून याचे पदसिध्द अध्यक्ष तहसीलदार तर सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी, न.प.चे मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी (समाज कल्याण पं.स.), तालुका कृषी/पशुसंवर्धन अधिकारी, तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), एकल/विधवा महिला व अनाथ बालकांचे पुनर्वसन क्षेत्रात काम करणार्या संस्थेचा प्रतिनिधी (अध्यक्षांद्वारे नामनिर्देशित), बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण/नागरीक) आदी सदस्य असणार आहेत. या तालुकास्तरीय समन्वय समितीला स्रंपूर्ण तालुक्यात कोविड-१९ या आजाराने दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेली बालके व करत्या पुरूषाचे निधन होवून एकल अनाथ झालेल्या महिलांबाबतची माहिती गावपातळीवर गठीत केलेल्या पथकाकडून प्राप्त करून घेवून अशा महिला व बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, गाव पातळीवरील पथकाद्वारे प्राप्त प्रस्तावापैकी तालुकास्तरावर मंजुरीचे अधिकार असलेल्या प्रस्तावांना संबंधित विभाग/ काार्यालयाकडून मान्यता मिळवून देणे, ज्या योजनांचे मंजुरीबाबतचे अधिकार जिल्हास्तरावर आहेत असे प्रस्ताव जिल्हास्तरीय अधिकार्यांना मंजुरीसाठी पाठविणे व सतत पाठपुरवठा करणे आदींसह अनेक कार्य आहेत.
तसेच मिशन वात्सल्य योजनेतंर्गत एकल विधवा महिला आणि अनाथ बालके यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना, शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, बँक खाते, आधारकार्ड, जन्म-मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावणबाळ योजना, बाल संगोपन योजना, अनाथ बालकांची शालेय प्रवेश व फी, घरकुल, कौशल्यविकास, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, शुभमंगल सामुहिक योजना, अंत्योदय याोजना आदी शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणार्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम समितीला करावे लागणार आहे.
सौ.कोमलताई सचिन तायडे यांच्या निवडीने तालुक्यातील एकल विधवा महिला, बालके यांना आता शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांचा हक्काचा एक प्रतिनिधी मिशन वात्सल्य समितीमध्ये गेल्याने मोठ्या प्रमाणावर लाभ मिळण्यास सहकार्य उपलब्ध होणार आहे.
कोविड-१९ च्या काळात दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेले बालक, करत्या पुरूषाचे निधन होवून एकल/विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मिशन वात्सल्य योजना सुरू करण्यात आली होती. आता महिला व बालविकास विभागाच्या वतीने १२ सप्टेंबर २०२५ रोजी एका जीआरद्वारे सदर मिशन वात्सल्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व विधवा, परितक्त्या महिलांना व अनाथ बालकांना देण्यात यावा यासाठी या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आल्याने आता गरजुंना लाभ घेणे सोपे होणार आहे.
