मलकापूर:- रोजंदारीने जगणाऱ्या सामान्य नागरिकांचे पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठीचे जगणे अक्षरशः असह्य झाले असताना मलकापूर नगर परिषदेचा प्रशासन मात्र समाधानाच्या झोपी गेलेला आहे. त्याच प्रशासनाला जाग आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी निवेदनाच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली.
आमदार राजेश एकडे यांच्या आदेशावरून व ज्येष्ठ नेते डॉ. अरविंद कोलते, श्यामभाऊ राठी, हाजी रशीदखा जमादार, ॲड. हरीश रावळ यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वात नगर परिषद प्रशासक व मुख्याधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
जनतेच्या समस्यांचा ‘पाणावलेला’ आक्रोश:
1. पूर्णामायला भरपूर पाणी असूनही नळाला १५ दिवस पाणी नाही, त्यामुळे नागरिक तहानलेले
2. पाणी पुरवठा विभागातील रखडलेली कामे – वाल्व, पाइपलाइन, मोटार दुरुस्ती, जलशुद्धी केंद्रे त्वरित कार्यान्वित करावीत
3. आरोग्य व्यवस्था कोलमडलेली – कचरा उचल नाही, नाली सफाई नाही, रस्ते स्वच्छ नाहीत
4. मयत दाखल्यासाठीची प्रक्रिया त्रासदायक – सुलभ व न्याय्य प्रणाली लागू करावी
5. शास्ती (जझिया) कर रद्द करावा – जनतेवरील अन्यायकारक बोजा दूर करावा
6. पावसाळ्यापूर्वी नाले व साचलेली घाण साफ करून फवारणी करावी
7. उन्हाळ्यातील पाणीटंचाईत नादुरुस्त हातपंप तत्काळ दुरुस्त करावेत
8. सालीपुरा येथील रखडलेले रस्त्याचे काम पूर्ण करावे
“जनतेला दिलासा नसेल, तर आंदोलन अटळ!”
या सर्व मागण्या ४–५ दिवसांत पूर्ण न झाल्यास काँग्रेसकडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनप्रसंगी अता मास्टर जमादार, अनिल गांधी, प्रमोददादा अवसरमोल, सुहास (बंडू) चवरे, युसुफ खान, तुषार पाटील, गिरीश देशमुख, अरुण गवात्रे, रईस जमादार, रूपेश बांगडे, विनय काळे, उस्मान मास्टर, ज्ञानदेव तायडे, प्रशांत नाफेडे, कलीम पटेल, अगर जमादार, वाजिद खान, बाशिद कुरैशी, शेख अबरार ठेकेदार आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.