मलकापूर :- मलकापूरच्या पारपेठ भागात नगरपरिषदेच्या दलित्तोर निधीतून सुमारे २० लाख रुपये खर्च करून नालीचे बांधकाम सुरू होते. ठेकेदाराने अलीकडे नालीवर ढापे टाकले, परंतु ते रात्री अचानक ढासळले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप उफाळला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर ढासळलेले ढापे दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप केला.प्रशासनाने मात्र यावर वेगळा दावा केला आहे. त्यानुसार, ढापे ढासाळलेले नाहीत, तर अज्ञात व्यक्तीने ते तोडले आहेत. मात्र, या दाव्याबद्दल नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जर हे ढापे तोडले गेले असतील, तर प्रशासनाने त्या व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही? काही नागरिकांच्या मते, ढापे निकृष्ट दर्जाचे असल्यानेच ते आपोआप कोसळले.
एका व्यक्तीने ठेकेदाराला २० फुटाचे ढापे टाकण्याचे सांगितले होते, परंतु ठेकेदाराने त्याऐवजी १० फुटाचे ढापे टाकले. यावरून संबंधित व्यक्तीने ठेकेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. स्थानिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.