मलकापूर : – शहरातील रेल्वे स्थानक परिसरात पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना १० फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून, दुचाकीच्या मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
लि. भो. विद्यालयाचे प्राचार्य गिरीश वैद्य (वय ५८, रा. विद्युत नगर, घिर्णी रोड, मलकापूर) हे कामानिमित्त १० फेब्रुवारी रोजी रेल्वेने अमरावती येथे गेले होते. प्रवासादरम्यान त्यांनी आपली लाल रंगाची ड्रीम युगा दुचाकी (क्र. एमएच २८ एव्ही ६२८६) रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंगमध्ये लावली होती. मात्र, परत आल्यानंतर त्यांना दुचाकी गायब असल्याचे लक्षात आले.
दुचाकीचा परिसरात शोध घेतला असता ती कुठेही सापडली नाही. त्यानंतर वैद्य यांनी मलकापूर रेल्वे पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ अंतर्गत कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
रेल्वे स्थानक परिसरात गाड्यांची सुरक्षा व्यवस्था कितपत सक्षम आहे, याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांनी आपल्या वाहनांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.