मेहकर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शहरातील लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्समधील पर्पल फूड कॉर्नर कॅफे येथे पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी सकाळी धाड टाकत अश्लील कृत्यांमध्ये गुंतलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. यामध्ये तिघे तरुण अश्लील चाळे करताना रंगेहात पकडले गेले असून, कॅफेचा मालक आणि भागीदार या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. तपासात उघड झाले की कॅफेचे मालक नीलेश शरद सोमण (३२, रा. रामनगर, मेहकर) आणि भागीदार कार्तिक गणेश चव्हाण (२२, रा. इंदिरानगर, मेहकर) यांनी कॅफेच्या वरच्या मजल्यावर खोल्या तयार करून त्या तरुण-तरुणींना भाड्याने देऊन अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन दिले होते. छाप्यात आकाश दिलीप वाहेकर (२५), आदित्य राजेश भातखोडे (२५) आणि हर्षल अशोक इंगोले (२४) हे तिघे असभ्य कृत्य करताना पकडले गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक दुचाकी, मोबाइल आदी साहित्य जप्त करून सुमारे ₹४५,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी सार्वजनिक नैतिकतेचा भंग आणि शासन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मेहकर पोलिस करत आहेत.
