मलकापूर :- पर्यावरण पुरक नॉन ओवन पुरक फॅब्रिक्स् कॅरीबॅगची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत निर्मिती करून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार्या एस.के.स्क्वेअर एन्टरप्रायजेस च्या संचालिका इंजि.सौ.कोमल सचिन तायडे यांना बुलढाणा येथे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
इंजिनिअरची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षीत सौ.कोमलताई सचिन तायडे ह्यांचे मलकापूर माहेर असून सासर मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील आहे. सर्वसामान्य कुटुंब असलेल्या परिवारातील सौ.कोमलताई यांनी महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतुने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत कापडी पिशव्या (नॉन ओवन फॅब्रिक्स् कॅरीबॅग) ची निर्मिती आपल्या एस.के.स्क्वेअर एटंरप्राईजेसच्या माध्यमातून सुरू करत शेकडो महिलांना रोजगार देण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या या उद्योगामुळे शेकडो महिलांना घरी बसूनच रोजगाराचे नवे दालन उघडले आहे. अल्पावधीतच त्यांनी या उद्योगाला चांगली चालना देत अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज बुलढाणा येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे कौतुकास्पद कार्य सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव, आ.संजय कुटे, माजीमंत्री आ.डॉ.राजेंंद्र शिंगणे, आ.संजय गायकवाड, आ.संजय रायमुलकर, आ.आकाशदादा फुंडकर, आ.श्वेताताई महाले, आ.वसंत खंडेलवाल, आ.किरण सरनाईक, माजी आ.चैनसुख संचेती आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार केवळ माझा नसून माझ्या समवेत काम करणार्या असंख्य महिलांचा सत्कार असून या सत्कारामुळे जबाबदारी वाढली आहे, असे मी मानते. सुरू केलेल्या या व्यवसायात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असून त्यांचा उत्साह, पाठींबा पाहता आगामी काळात शेकडो महिलांना मिळत असलेला रोजगार हजारोंच्या संख्येत कसा मिळेल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.
– इंजि.सौ.कोमल सचिन तायडे
कोमल गेल्या काही दिवसांपासून एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेसच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सतत परिश्रम घेत आहे. अनेकदा पतीमुळे पत्नीचे नाव होते, मात्र पत्नीमुळे पतीचे नाव मोठे झाल्याचे क्वचितच असते. त्यामुळे माझ्या पत्नीचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेला सत्कार निश्चितच कौतुकास्पद असून पत्नी म्हणून मला कायमच कोमलचा अभिमान असेल.
– इंजि.सचिन तायडे