जळगाव जामोद : तालुक्यातील खेर्डा बु. गावात एक ३५ वर्षीय विवाहित शेतमजूराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद ऊर्फ परमेश्वर समाधान वानखडे यांनी त्यांच्या राहत्या घरात छताच्या लोखंडी पाइपला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. त्यांचा भाऊ पवन समाधान वानखडे यांनी याबाबतची फिर्याद जळगाव जामोद पोलिस स्टेशनला दिली. या घटनेवरून पोलिसांनी मर्ग क्रमांक ९३/२०२४ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम १९४ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानंतर मृत प्रमोद वानखडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक ५ वर्षांचा मुलगा, ७ वर्षांची मुलगी आणि भाऊ असा आप्त परिवार आहे, त्यांच्यावर या दुःखद घटनेचे सावट पसरले आहे.