पिंपळगाव राजा : ढोरपगाव शिवारात खरबुज चोरीसाठी आलेल्या दोघा चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांकडून सुमारे ८ हजार रुपये किमतीचे १५० ते १६० किलो खरबुज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. आरोपी अमन दीपक लोखंडे आणि प्रेम दादाराव इंगळे, दोघेही रा. भालेगाव बाजार, यांनी संगनमत करून ढोरपगाव शिवारातील खरबुज चोरले. ते खरबुज पोत्यात भरून दुचाकीवरून नेत असताना शेतकरी अशोक इंगळे यांनी त्यांना रंगेहात पकडले. या घटनेबाबत ८ एप्रिल रोजी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), २२९(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.