मलकापूर : – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पॉलिटेक्निक विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या भव्य कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक परंपरा, नियमावली, प्रयोगशाळा, वाचनालय, क्रीडा, सांस्कृतिक व तांत्रिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास या यशाच्या गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव डॉ. अरविंद कोलते यांनी आपल्या मनोगतात तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. पॉलिटेक्निक शिक्षण विद्यार्थ्यांना थेट उद्योगजगताशी जोडून त्यांना रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देते, असे ते म्हणाले.
प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षा, प्रकल्प कार्य आणि कौशल्य विकासाची गोडी लावण्याचे आवाहन केले. आयक्यूएसी समन्वयक प्रा. रामाकांत चौधरी यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर संवादकौशल्य व सकारात्मक विचारसरणीचे महत्त्व स्पष्ट केले. पॉलिटेक्निक इंचार्ज प्रा. संदीप खाचणे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उपक्रमांचा सविस्तर परिचय करून दिला. विभाग प्रमुखांपैकी कॉम्प्युटर विभागाचे प्रा. महेश शास्त्री, इलेक्ट्रिकल विभागाचे प्रा. जयप्रकाश सोनोने, मेकॅनिकल विभागाचे प्रा. साकेत पाटील व सिव्हिल विभागाचे प्रा. गजान सुपे यांनी विभागनिहाय कार्यपद्धती व सुविधा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष प्रदीप कोलते, खजिनदार सुधीर पाचपांडे व सदस्य अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली संस्था सातत्याने प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. या इंडक्शन प्रोग्रामदरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता, वाचनालय, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, कौशल्य विकास आणि करिअरच्या विविध संधींबाबत मौल्यवान माहिती मिळाली. वरिष्ठ प्राध्यापकांनी अनुभवाधारित मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाचा योग्य दृष्टिकोन दिला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी अनुभव व्यक्त करताना या प्रोग्राममुळे आत्मविश्वास वाढला, महाविद्यालयाविषयी आपलेपणाची भावना निर्माण झाली आणि भविष्यातील शैक्षणिक प्रवासाबाबत नवी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.
