मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) – शहरातील आरोग्यम् हॉस्पिटलच्या अवैध बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. अवैध बांधकाम प्रकरणी तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी संबंधितास एक महिन्याच्या आत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. अन्यथा फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून केवळ वेळकाढूपणाचे धोरण राबवले जात असल्याने जनतेत नाराजी पसरली आहे.
या निष्क्रियतेचा निषेध म्हणून अलीकडेच अजय टप यांनी मुख्याधिकारी यांच्या गाडीवर काळे ऑईल फेकून निषेध नोंदवला. यानंतर डॉ. शेळके यांनी मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गाडीचे ३०० रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.
या नुकसानीच्या भरपाईसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात शहरातील गरजू आणि गरीब नागरिकांना खिचडी, मठ्ठा आणि लाडूचे वाटप करण्यात आले. ही आगळीवेगळी प्रतिक्रिया नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोधर, प्रहारचे तालुका प्रमुख अजित फुंदे, शहर प्रमुख शालीकराम पाटील, युवा अध्यक्ष उमेश जाधव, तसेच बलराम बावस्कार, बंडूभाऊ वाघमारे, किशोर पानट, करण शिरसवाल, नवलसिंग शिंदे, राजवर्धन जाधव, रणवीर जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्षाच्या या अनोख्या आंदोलनाने शहरात एकच चर्चा रंगली असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आरोग्यम् हॉस्पिटलच्या अवैध बांधकामावरून संताप; नुकसानीच्या भरपाईसाठी प्रहार उपजिल्हा प्रमुख अजय टप याच्या कडून गरिबांना अन्नवाटप
