मलकापूर:- येथील युवा उद्योजक व चैतन्य उद्योग समुहाचे संचालक प्रसन्न अशोकराव देशपांडे यांची महाराष्ट्र शासनाच्या महा-हब इन्क्यूबेटर अॅन्ड इनोव्हेशन सेंटरच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. ५ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उद्योजकतेला चालना देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात महा- हब इन्क्यूबेटर आणि इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. हे सेंटर चालविण्यासाठी कंपनी कायदा २०१३ मधील कलम ८ नुसार ना नफा ना तोटा या तत्वावरील कंपनी स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता संचालक मंडळाची रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील १३ नामवंत उद्योजकांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये आदित्य बिर्ला गृपचे कुमारमंगलम अध्यक्ष बिर्ला, महिंद्रा अँड महिंद्रा गृपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, जीओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे संचालक आनंत अंबानी, कल्याणी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबा कल्याणी, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्षा मानसी किर्लोस्कर, कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक जय कोटक, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ नितीन गुप्ते आदी नामवंत उद्योजकांसह मलकापूर येथील चैतन्य बायोटेकचे संचालक तथा युवा उद्योजक प्रसन्न देशपांडे यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.