Headlines

रुग्णांच्या जिवावरचा डल्ला; मलकापूरात पॅथॉलॉजी लॅब चालकांची सर्रास लूट, वैद्यकीय अधीक्षक लक्ष देतील काय?

मलकापूर ( दिपक इटणारे ) : आजाराने होरपळलेल्या रुग्णांच्या जिवावर डल्ला घालण्याचे धक्कादायक वास्तव मलकापूरात समोर आले आहे. शहरातील काही पॅथॉलॉजी लॅब चालक रुग्णांच्या कमकुवतपणाचा फायदा घेत सर्रास लूट करत असल्याचे उघड झाले आहे. उपचारासाठी आधीच औषधोपचार, डॉक्टरांचे शुल्क, हॉस्पिटल खर्च यामुळे हैराण झालेल्या रुग्णांना तपासण्यांच्या नावाखाली आणखी आर्थिकदृष्ट्या पिळवटून काढले जात आहे.

स्थानिक तपासणीत असे दिसून आले आहे की, प्रत्येक लॅबमध्ये एकाच टेस्टसाठी किमान १५० ते २०० रुपयांचा फरक आकारला जात आहे. काही ठिकाणी साधी तपासणी जिथे ३०० रुपयांत केली जाते, तर त्याच तपासणीसाठी दुसऱ्या लॅबमध्ये तब्बल ५०० रुपये वसूल केले जात आहेत. हा उघड फरक म्हणजे सरळसरळ रुग्णांची फसवणूक असून, यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर प्रचंड आर्थिक ताण निर्माण झाला आहे. आजाराने त्रस्त रुग्णांची लूटमार करणाऱ्या पॅथॉलॉजी लॅब चालकांविरुद्ध तातडीने कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने दर नियंत्रणाची सक्ती करावी आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासन मौन बाळगून असल्याने रुग्णांमध्ये नाराजी पसरली आहे. लॅब चालकांच्या मनमानी दरामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून, यापुढे या लूटमारीवर अंकुश बसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!