मलकापूर : मलकापूर-बुलढाणा रस्त्यावर देवदर्शनासाठी निघालेल्या दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले, मात्र दोन्ही वाहनांतून एअर बॅग वेळेवर उघडल्याने सर्व प्रवासी सुदैवाने थोडक्यात बचावले. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
सविस्तर माहिती अशी की, उज्जैनकडे देवदर्शनासाठी जात असलेले चारचाकी वाहन (क्र. MH 38 AD 7239) बुलढाणा येथून मलकापूरकडे येत होते. त्याचवेळी मलकापूरकडून बुलढाण्याकडे जाणारे दुसरे चारचाकी वाहन (क्र. MH 28 BQ 6368) राजेंद्र गोडे फार्मसी कॉलेजसमोर आल्यानंतर दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात दोन्ही गाड्यांचे पुढचे भाग अक्षरशः चकनाचूर झाले. दरम्यान, धडकेनंतर दोन्ही गाड्यांतील एअर बॅग उघडल्याने वाहनातील प्रवासी गंभीर दुखापतींपासून वाचले. घटनास्थळी लगेचच मलकापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश गिरी यांनी धाव घेतली व कोणालाही दुखापत झाली आहे का याची खातरजमा करून पुढील कारवाईचे आदेश दिले. यावेळी बंद झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातस्थळी गोपनीय विभागाचे मनोज उमाळे पाटील, शाम शिरसाट, सोनवणे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताने पुन्हा एकदा सुरक्षित वाहन चालवण्याचे आणि रस्त्यावरील सावधगिरीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
मलकापूर-बुलढाणा रस्त्यावर देवदर्शनासाठी निघालेल्या दोन चारचाकी वाहनांची गोडे कॉलेज जवळ समोरासमोर धडक; एअर बॅगने वाचवले प्राण; जीवितहानी नाही
