मलकापूर : मलकापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. २ च्या बाजूला उभारण्यात आलेल्या आर.सी.सी. भिंतीमुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्थानकात प्रवेश मिळविण्यासाठी नागरिकांना तब्बल दोन किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पंतनगर, एकतानगर, हाश्मी नगर, कुंड खुर्द, भालेगाव, देवधाबा, धरणगाव, नरवेल, म्हैसवाडी, अनुरावाद, झोडगा, धुपेश्वर, दसरखेड, तालसवाडा, रुईखेड, तिघरा, शिवनी, रणगाव या गावांतील प्रवासी या समस्येमुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. वृद्ध, महिला, विद्यार्थी व शेतकऱ्यांना दररोज प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर समतेचे निळे वादळ संस्थेचे अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांनी निवेदन दिले. प्लॅटफॉर्म क्र. २ वरील भिंतीत मोठे गेट तयार करणे आणि स्वतंत्र बुकिंग विंडो सुरू करणे, या दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही प्रवाशांनी दिला आहे. सदर निवेदन आमदार चैनसुख संचेती यांच्यामार्फत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना देण्यात आले असून प्रत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ यांनाही पाठविण्यात आली आहे. या वेळी एन. के. हिवराळे, सतीश नाईक, किशोर रोडे, निखिल चीम, संजय रोडे, दीपक मेश्राम, समाधान सुरवाडे, शिवाजीराव भोसले, रोहीत माहूरे, पंकज पालवे, दीपक मोरे, मिलिंद हिवराडे, सिद्धार्थ भालशंकर, रोहन भालशंकर, सचिन तायडे, प्रवीण नाईक यांच्यासह महिला व पुरुष प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. चैनसुख संचेती यांनी या समस्येवर सकारात्मक भूमिका घेत केंद्रीय स्तरावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तातडीने तोडगा न निघाल्यास प्रवासी थेट रेल रोको आंदोलनाचा इशारा देत आहेत.
मलकापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक – आर.सी.सी. भिंतीमुळे त्रस्त नागरिक, गेट व बुकिंग विंडोची मागणी; अन्यथा रेल रोको आंदोलन करू – अशांत भाई वानखेडे
