मलकापूर (प्रतिनिधी – दिपक इटणारे) : धुवाधार पावसाच्या सरींमध्येही मलकापूर शहरात दुर्गा देवीची मिरवणूक उत्साहात पार पडली. लेझीमच्या तालावर पारंपरिक वादनाने भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे शांततेचा भंग झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराजांचा देखावा विशेष आकर्षण ठरला. सायंकाळी सातच्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ झाला. पावसाचे धुवाधार थेंब झेलूनही तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवदुर्गा माता भक्तिभावात विराजमान झाल्याने वातावरण अधिकच मंगलमय झाले. भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून देवीचे दर्शन घेतले. मात्र, डीजे संस्कृतीमुळे पारंपरिक वाद्यांची छटा फिकी पडली. काही मंडळांनी लेझीम खेळून संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला. पण बहुतांश मंडळांनी डीजेला प्राधान्य दिल्याने गोंगाट वाढला. यामुळेच दोन मंडळांमध्ये वादाची ठिणगी पडली. डीजेचा आवाज जास्त असल्याचे दर्शवण्यासाठी काही तरुणांनी अश्लील हावभाव केले. त्यावरून मिरवणुकीतच बाचाबाची झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या गोंधळानंतर मलकापूर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ९ डीजे चालकांवर दंडात्मक कारवाई केली. तरीदेखील भक्तिभावात सुरू असलेली मिरवणूक अखेर शांततेत पार पडली. दरम्यान, गायत्री नवदुर्गा मंडळ आणि माता महाकाली नगर मंडळाने सादर केलेला छत्रपती संभाजी महाराजांचा देखावा पावसातही आकर्षणाचा विषय ठरला. तसेच, मुसळधार पावसात कर्तव्य बजावत असलेले पोलिस कर्मचारी यांचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल होत असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.