देऊळगावराजा: तालुक्यातील सिनगाव जहाँगीर-गारगुंडी रोडवरील पुलाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.
राजू अनील पवार (वय १४, रा. मेहुणाराजा) हा स्प्लेंडर प्लस या विना क्रमांकाच्या दुचाकीवरून सिनगाव जहाँगीर येथून मेहुणाराजा गावाकडे जात असताना ट्रॅक्टरने भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात राजू गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय गुट्टे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. मात्र, तपासणीनंतर राजूला मृत घोषित करण्यात आले. अपघातानंतर श्याम राम शिराळे (रा. मेहुणाराजा) यांनी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करत आहेत. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव व निष्काळजी वाहन चालवण्याविरोधात कडक कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.