खामगाव : येथील किसन नगर भागात २ डिसेंबर रोजी नायलॉन मांज्याने एका दुचाकीस्वाराचा गळा कापल्या गेल्याने एक युवक गंभीरपणे जखमी झाल्याची घटना घडली. जखमी झालेल्या युवकावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार, महेबूब नगरातील शेख अलिम शेख अहमद (२७) हे सुटाळा बु. येथील एका दुचाकी शोरूममध्ये मॅकेनिक म्हणून काम करतात. सोमवारी नियमित काम संपवून ते एमआयडीसी बायपासमार्गे महेबूब नगरकडे दुचाकीवर जात होते. त्यावेळी किसन नगरजवळ त्यांच्या गळ्यात पतंगाचा नायलॉन मांजा अडकला. हा मांजा त्यांच्या गळ्याला आणि हातालाही लागल्याने गंभीर इजा झाली. त्यांना त्वरित खामगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या गळ्यावर आणि हातावर टाके मारण्यात आले.या घटनेबाबत पोस्टेत अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. परिसरातून बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाईची मागणी होत आहे.
नायलॉन मांज्याने गळा चिरून एक जण गंभीर जखमी, खामगाव शहरातील घटना!
