संग्रामपूर:- तालुक्यातील सायखेड शिवारात गुरुवारी सकाळी शेतात काम करत असलेल्या दोन शेतमजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात एक शेतमजूर गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायखेड येथील सलीम हुसेन केदार (वय ३०) आणि जालम हुसेन सुरत्ने (वय ५०) हे दोघे गुरुवारी सकाळी त्यांच्या संत्रा बागेत पाइप उचलून ठेवत असताना अचानक झुडपातून एक अस्वल बाहेर येऊन त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात सलीम केदार गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्यावर, पाठीवर, कमरेवर आणि पायावर खोल नखांचे घाव झाले आहेत. तर जालम सुरत्ने किरकोळ जखमी झाला. दोन्ही जखमींना तत्काळ स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले असून, सलीम केदार याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे