मलकापूर ( दिपक इटणारे ) – शहरात काल दुपारी नशिराबाद पोलिसांनी चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या तपासासाठी धडक कारवाई केली. मात्र, या कारवाईनंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपींनी चोरीचे दागिने विकल्याचे कबूल केलेल्या ज्वेलर्सवर कोणतीही कारवाई न झाल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत एका महिला आणि पुरुषाने सोन्याचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान आरोपींनी मलकापूर येथील तुलसी ज्वेलर्समध्ये सुमारे सहा ग्रॅम चोरीचे सोने विकल्याची माहिती दिली. त्यानंतर नशिराबाद पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन २४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास बुलढाणा रोडवरील तुलसी ज्वेलर्स येथे कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तुलसी ज्वेलर्समधून सुमारे सहा ग्रॅम चोरीचे सोने हस्तगत केले. सकाळी सुमारे १२ वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी ५.३० पर्यंत सुरू होती. पत्रकार घटनास्थळी पोहोचल्यावर नशिराबादचे पीएसआय यांनी सुरुवातीला प्रतिक्रिया देण्याचे आश्वासन दिले. मात्र, नंतर त्यांनी या संदर्भात बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले आणि “प्रतिक्रिया जळगावचे एसपी देतील” असे सांगून विषय टाळला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “एखाद्या चोरीचा मोबाईल कोणी घेतल्यावर तो ट्रॅक झाल्यानंतर त्या व्यक्तीलाही आरोपी करण्यात येतं. मग एवढं मोठं प्रकरण असताना ज्वेलर्स मालकावर कारवाई का नाही? पोलिस त्याची पाठराखण का करत आहेत?” असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या प्रकरणात “नशिराबाद पोलिसांनी लक्ष्मी दर्शन घेतले आणि प्रसाद एसपी देतील का?” असा प्रश्नही नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. चोरीचे दागिने विकत घेणे हाही कायद्याने गुन्हा असूनही ज्वेलर्सवर कोणतीही कार्यवाही झाली नाही, यामुळे पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा वस्तुनिष्ठ तपास करून वस्तुस्थिती उघड करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.