देऊळगाव राजा : – कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या मेहुना राजा येथील अल्पभूधारक शेतकरी किशोर श्यामराव डोंगरे (वय ४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. किशोर डोंगरे यांनी शेतीसाठी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. याशिवाय दोन मुलींच्या लग्नाचा मोठा आर्थिक खर्च आणि नियमित बँक हप्त्यांचा ताण त्यांच्या डोक्यावर होता. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्यांनी एका मुलीचा विवाह पार पाडला होता.
याशिवाय, डोंगरे हे मागील काही वर्षांपासून एका अपघातात पायाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे सतत वेदनेत होते. त्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत गेले होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, डोंगरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली आणि इतर कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण आणि अपुऱ्या मदतीमुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ का यावी, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
कर्जबाजारीपणाचा मानसिक ताण सहन न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना!
