खामगाव (प्रतिनिधी) – खामगाव तालुक्यातील कीन्ही महादेव ते खेर्डी मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी, १० मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली.
खेर्डी येथील प्रसाद संतोष पताळे व त्याचा भाऊ अभिषेक संतोष पताळे हे दोघे दुचाकीने खामगावकडे जात होते. अभिषेक खामगाव येथील एका शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत असून प्रसाद त्याला शाळेत सोडण्यासाठी घेऊन निघाला होता. दरम्यान, कीन्ही महादेव पुलाजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
या अपघातात प्रसाद पताळे याचा जागीच मृत्यू झाला, तर अभिषेक गंभीर जखमी झाला आहे. जखमी अभिषेकला तात्काळ खामगाव येथे प्रथमोपचारासाठी नेण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे हलवण्यात आले. या अपघातामुळे खेर्डी गावात शोककळा पसरली असून प्रसादच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.