मलकापूर: ग्रामसभेत ग्रामस्थांशी अरेरावी करीत मग्रुरीने वागणाऱ्या ग्रामसेविकेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी १० सप्टेंबर रोजी दसरखेड येथील संभाजी हरी पाटील सह इतर शेकडो ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मौजे दसरखेड ग्रामपंचायत येथे ६ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत सचिव तथा ग्रामसेविका संध्या रामा निंबोळकर यांना काही ग्रामस्थांनी काही विकास कामे तथा ग्रामपंचायत अतंर्गत येत असलेल्या शासकिय योजनांसंदर्भात जाब विचारून काही प्रश्न उपस्थिती केले. ग्रामस्थांचे प्रश्न रितसर होते, परंतु त्या प्रश्नांची कोणतेही उत्तर न देता ग्रामसेविकेने मोठ्या आवेशात ग्रामस्थांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.अरेरावी करीत ग्रामस्थांवर दमदाटी करण्यात आली. एवढेच नव्हे तर मला वाटेल तसा मी कारभार करेल, तुम्ही विचारणारे कोण असा प्रश्न उपस्थित करीत ग्रामसेविकेने जास्त बोलाल तर याद राखा तुमच्या विरुध्द पोलिस स्टेशन ला खोटया तक्रारी दाखल करून तुम्हाला आत टाकेल असा धमकी वजा इशारा देत ग्रामसेविकेने सरळ पोलिस स्टेशन गाठित काही ग्रामस्थां विरुध्द खोटया तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न केला हि बाब निदंनिय व तेवढीच निषेधार्ह आहे. तरी ग्रामस्थांचा अनादर करणाऱ्या अशा उर्मट प्रवृत्तीच्या ग्रामसेविकेवर येत्या ८ दिवसाच्या आत निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला आपल्या कार्यालय समोर आमरण उपोषण करावे लागेल. असा इशारा सुद्धा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर संभाजी पाटील,एकनाथ डोसे, सुपडा गोसावी,राजू महाजन, सुधाकर डोसे, मारोती बिरहाडे, हरि बोंडे यासह तब्बल १०८ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून या निवेदनाचा प्रतिलिपी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे माहिती व उचित कार्यवाहीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.