मलकापूर : पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्युत विभागाने औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव व व्यावहारिक ज्ञान मिळवून देण्यासाठी मोताळा येथील ओ२ सायक्लिक एनर्जी पॉवर प्रा. लि. या १०० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला भेट दिली. ऊर्जा निर्मिती, प्रसारण व वितरण या विषयावर आधारित या औद्योगिक भेटीत एकूण ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या भेटीचा मुख्य उद्देश सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करणे व आधुनिक उपकरणांबाबत माहिती मिळवणे हा होता. ओ२ सायक्लिक एनर्जी पॉवर प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा कशी निर्माण केली जाते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. प्रकल्पामध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानासह द्विमुखी सौर उपकरणांची कार्यप्रणाली समजावून सांगण्यात आली. याशिवाय, सौर प्रकल्प आणि ग्रीड यांच्यातील समन्वय प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या प्रकल्पाच्या कार्यप्रणालीमुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाचा आधार मिळाला.
ही औद्योगिक भेट प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे आणि विद्युत विभागाचे प्रमुख प्रा. जयप्रकाश सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. पी. एस. ठाकरे यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना प्रा. मयूर पखाले व प्रा. ए. आर. भटकर मॅडम यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. ओ२ सायक्लिक एनर्जी पॉवर प्रकल्पाचे प्रकल्प अभियंता अमोल सर यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली व त्यांच्या शंकांचे निरसन केले.
विद्यार्थ्यांनी या औद्योगिक भेटीबद्दल समाधान व्यक्त केले. प्रत्यक्ष प्रकल्प पाहिल्यामुळे त्यांना ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील विविध तांत्रिक बाबी समजल्या व नवीन गोष्टी शिकण्यास प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रशासकीय डीन आणि विद्युत विभागप्रमुखांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी अशा प्रकारच्या औद्योगिक भेटी नियमितपणे आयोजित करण्याची विनंती केली. विद्युत विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सौरऊर्जा प्रकल्पातील तांत्रिक व व्यावसायिक दृष्टिकोन समजण्यास मदत झाली. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व औद्योगिक क्षेत्रातील भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. कोलते महाविद्यालयाच्या वतीने भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवले जातील, अशी माहिती महाविद्यालयाचे सदस्य श्री. देवेंद्र पाटील व डॉ. गौरव कोलते यांनी यावेळी दिली.