Headlines

मलकापूरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरी! दोन अज्ञात इसमांनी महिला शिक्षिकेची पोत हिसकावली

मलकापूर ( दिपक इटणारे ): शहरातील बुलढाणा रोड परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील पदमालय अपार्टमेंट येथे राहणाऱ्या सौ. सोनल आशिष राठी ( वय 42 ) या आपल्या मुलीसह खरेदीसाठी गेल्या असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

सौ. राठी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आपल्या 15 वर्षीय मुलगीसह स्कूटीवरून जीएस मॉल व डागा मार्ट येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतताना सिध्दीविनायक हॉस्पिटलसमोर दोन इसम शाइन मोटारसायकलवरून आले. त्यापैकी एका इसमाने निळ्या रंगाचा तर दुसऱ्याने काळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता. या दोघांनी शिक्षिकेच्या स्कूटीला आडवे उभे राहून गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची पोत (अंदाजे किंमत ₹75,000) जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेनंतर घाबरलेल्या शिक्षिकेने तातडीने आपल्या पतीला फोन करून सर्व प्रकार सांगितला आणि नंतर मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सदर घटनेने शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या साखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मलकापूर शहरात चोरट्यांना पोलिसांची थोडी ही भीती नाही अशी परिस्थिती झाली असल्याची नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!