मोताळा :- तालुक्यातील पोखरी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना घडली असून, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोखरी येथील रहिवासी उल्हास एकनाथ घाटे यांनी धामणगाव बढे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील अविनाश कैलास हिवाळे हे त्यांच्या घराशेजारी राहतात. घटनेच्या दिवशी घाटे शेतातून परत आल्यावर जेवण करत असताना अविनाश हिवाळे यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाला लाथ मारून, “तू या रस्त्याने जायचे नाही, हा रस्ता माझ्या मालकीचा आहे,” असे म्हणत शिविगाळ केली आणि मारहाण केली.फिर्यादीचे वडील एकनाथ घाटे यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचदरम्यान, अविनाश हिवाळे यांनी उल्हास घाटे यांना काठीने खांद्यावर मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. उल्हास घाटे यांच्या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांनी आरोपी अविनाश कैलास हिवाळे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुरेश सोनवणे करत आहेत.