जानेफळ : – शिवाजी हायस्कूल, जानेफळचे मुख्याध्यापक रत्नाकर शिवाजी गवारे यांनी कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तब्बल एक वर्षानंतर मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष, त्यांचा भाऊ, दोन शिक्षक आणि एका लिपिक अशा पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ मार्च २०२४ रोजी मुख्याध्यापक गवारे यांनी कार्यालयात गळफास घेऊन जीवन संपवले होते. त्या वेळी फक्त आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, एक वर्षानंतर गवारे यांचे वडील शिवाजी तुकाराम गवारे यांच्या तक्रारीनंतर कारवाई झाली.
तक्रारीनुसार, अध्यक्ष सागर श्रीकृष्ण देवकर, त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर देवकर, शिक्षक गजानन काळे, तुळशीदास शेळके आणि कनिष्ठ लिपिक अनिल चांदणे यांनी गवारे यांच्यावर मानसिक दबाव टाकला. खोट्या कामासाठी जबरदस्ती, तसेच राजीनामा देण्यासाठी वारंवार तगादा लावल्यामुळे गवारे हे तणावात आले आणि आत्महत्येस प्रवृत्त झाले, असा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीनंतर ४ एप्रिल रोजी वरील पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.
मुख्याध्यापकाच्या मृत्यूमागे दबावाचा खेळ? एक वर्षानंतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
