खामगाव (प्रतिनिधी): शहरातील धोबी खदान परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याची घटना दि. १० मार्च रोजी रात्री १०:३० वाजता घडली. याप्रकरणी ११ मार्च रोजी खामगाव शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सोनु राजेंद्र शमी (वय ३८, व्यवसाय सुतारकाम, रा. धोबी खदान) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, सुनंदा पांडुरंग घोडे व आकाश पांडुरंग घोडे (वय २८, रा. धोबी खदान) या दोघांनी वाद घालून प्रथम शिवीगाळ केली आणि त्यानंतर आकाश घोडे याने त्यांच्या डोक्यात विट मारून गंभीर दुखापत केली. घटनेदरम्यान सोनू शमी यांच्या पत्नीने आरडाओरड केली असता, शेजारील चेतन इंगळे, सविता बोरकर, सोनु बोरकर व भावना इंगळे यांनी हस्तक्षेप करून भांडण सोडवले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ११८(१), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड करीत आहेत.