मलकापूर :- शहरातील सारथी इंटरनॅशनल हॉटेल परिसरात एक गाय पोट फुगल्याने विव्हळत होती. गाईचा जीव मेटाकुळीस आला होता. अवघ्या काही मिनिटात यमदूत प्राण घेणारच तेवढ्यात देवदुत बनून आलेले पशु वैद्यकीय डॉक्टर भोळे व डॉक्टर शेंबेकर यांनी कर्तव्याची पराकाष्टा करून अखेर मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या मरत्या गाईला यमदुताच्या तावडीतून सोडवून नवीन जीवनदान दिले.
याबाबत सविस्तर असे की एक गाय सुनील टॉकीज रोडवर आस्थावस्त अवस्थेत असल्याचे प्रा कृष्णा मेसरे यांना कळाले. बाबत मेसरे यांनी डॉक्टर गजानन भोळे पशुधन विकास अधिकारी गट-अ मलकापूर, यांना दूरध्वनीवरून माहिती दिली व अवघ्या काही मिनिटात डॉ गजानन भोळे व डॉ चेतन शेंबेकर पशुधन विकास अधिकारी गट -अ, दसरखेड हे पोहोचले. दोघांनी गायीची परिस्थिती गंभीर असल्याचे निष्पन्न केले व तातडीने गॅस पास होणे आवश्यक असल्याबाबत प्रथम निर्णय घेतला. यानुसार गाईच्या पोटात सुई टोचून बघितली असता गॅस पास होण्याऐवजी पाणी यायला लागल्याचे पाहून सदर प्रकार हा “रुमीनल टिंम्पनी” चा असल्याचे म्हणजे पोटात प्लास्टिक साचलेले असल्याचे सांगून,’गाईचे त्वरित पोट फाडून ऑपरेशन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही’ असे निदान केले. गाईचे ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला व गायीच्या ऑपरेशनला सुरुवात झाली.बघता बघता गायीच्या पोटातून साधारणता 40 ते 45 किलो प्लास्टिक गच्च बसलेले बाहेर काढण्यात आले. बघ्यांची गर्दी गायीच्या पोटातील प्लास्टिक पाहून आश्चर्यचकित होत होती. सदर ऑपरेशन साधारणतः दोन ते तीन तास भर उन्हात सुरू होते.अक्षरशः दोन्हीही डॉक्टरांच्या शरीराचे घामाचे लोट वाहत होते. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. मरणाच्या दारात असणाऱ्या गाईला जीवनदान मिळाले.
डॉक्टरांच्या योग्य काळजीमुळे वाचला गाईचा जीव
पुरेसे साधनसामग्री व व्यवस्था नसतांना व सुयोग्य ठिकाणी नेण्यासाठी गाईकडे वेळ नसल्याने आहे त्या ठिकाणीच भर उन्हात, तोडक्या-मोडक्या साधनसामुग्रीत कर्तव्याची प्रगल्भ निष्ठा ठेवून हिमतीने सदर गाईला जीवनदान दिले.