मलकापूर (दिपक इटणारे) : विधानसभा निवडणुकीला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले असतानाही मलकापूर मतदारसंघातील विकासाची गंगा अद्यापही थांबलेलीच आहे. निवडणुकीपूर्वी विकासाचे गाजावाजा करून मतदारांना ‘स्मार्ट मलकापूर’चे स्वप्न दाखविणाऱ्या सत्ताधारी भाजपसमोर न.प. निवडणूकित नगराध्यक्ष-नगरसेवक पदांचे उमेदवार कोणत्या तोंडानी मत मागणार? असा विश्वासाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार चैनसुख संचेती यांनी शहरातील सर्वच क्षेत्रात विकासाचे आश्वासन देत जनतेसमोर मोठी आशा निर्माण केली होती. आरोग्यसेवा बळकट करणे, रस्त्यांचे जाळे उभे करणे, शहर सौंदर्यीकरण, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणे अशी अनेक आश्वासने त्यांच्या भाषणातून गाजली. मात्र प्रत्यक्षात त्या सर्व आश्वासनांचा ठसा आज शहरात कुठेच दिसत नाही. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणीपुरवठ्याची विस्कळीत व्यवस्था, वाढते प्रदूषण आणि आरोग्य सेवांची अपुरी साधनसामग्री या सगळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विकासाच्या नावावर फक्त भाषणं झाली, पण काम काहीच झालं नाही, असा संताप मतदारवर्गात स्पष्टपणे दिसून येतो. येत्या काही दिवसांत नगरपालिका निवडणुकीची घोषणा अपेक्षित आहे. अशा स्थितीत भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार जनतेसमोर कोणत्या तोंडाने पुढे जाऊन मतांचा जोगवा मागणार, हा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे. कारण मलकापूर शहराचे नेतृत्व करणारे आमदार चैनसुख संचेती हेच या मतदारसंघातील भाजपचे प्रमुख चेहरे आहेत. त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली उमेदवार उभे राहणार हे स्पष्ट असले तरी, जनतेसमोर अपूर्ण आश्वासनांचा आणि ठप्प विकासाचा हिशोब देणे टाळणे त्यांच्यासाठी कठीण ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीपासून आजवर विकास नामशेषच राहिला आहे. जनता आशेने वाट पाहत होती, पण प्रत्यक्षात काहीच घडले नाही. मग पुन्हा कोणावर विश्वास ठेवायचा? असा सवाल सामान्य नागरिक विचारताना दिसतो. राजकीय पातळीवर पाहता, मलकापूरमधील भाजपसमोरचे आव्हान केवळ निवडणुकीचे नाही, तर त्यांच्या विश्वासार्हतेचे आहे. विकासाच्या नावे दिलेली आश्वासने, आणि जनतेत वाढती नाराजी या सर्वाचा थेट परिणाम आगामी निवडणुकीत उमेदवारावर होणार हे निश्चित आहे. आता प्रश्न इतकाच उरतो की जनतेने भाजपला मतदान करून पुन्हा एकदा निराशेचे बीज आपल्या पदरी टाकून घ्यायचे का, की बदलाची नवी दिशा निवडायची?