मलकापूर:- “चोरी केली की वेशीवर नाच” असं म्हणतात; पण मलकापूरातील या प्रकरणात मात्र चोर आणि विकत घेणारा – दोघांवरही समान कारवाई झाली नाही. उलट ज्यांनी चोरीचे सोने विकत घेतले त्यांच्यावर कुठलीच तात्काळ कारवाई न करता पोलिसांनी तो विषय पातळ केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ही संपूर्ण कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून “जेथे पैसा तिथे गंडासा बोळसा” ही म्हण लोकांत जोर धरू लागली आहे.
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत एका महिला आणि पुरुषाने सोन्याचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान आरोपींनी कबुली दिल्यानंतर त्यांनी मलकापूर येथील तुलसी ज्वेलर्समध्ये सुमारे सहा ग्रॅम चोरीचे सोने विकल्याचे उघड झाले. यानंतर नशिराबाद पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन (२४ जुलै) दुपारच्या सुमारास बुलढाणा रोडवरील तुलसी ज्वेलर्स येथे धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तुलसी ज्वेलर्समधून चोरी केलेले सुमारे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. पोलिसांच्या अचानक धाडीसह दुकानमालकाचीही तारांबळ उडाली. मात्र, एवढी मोठी कारवाई करूनही दुकानमालकावर कोणतीही तात्काळ कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारवाईबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी नशिराबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी एपीआय मनोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करून “तपास अधिकारी कोळी यांच्याकडून प्रतिक्रिया घ्या” असे सांगितले. त्यानंतर तपास अधिकारी पीएसआय कोळी यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी “आमच्या प्रभारी साहेबांकडूनच प्रतिक्रिया घ्या” असे सांगत फोन कट करून टाकला. अर्धवट संवाद झाल्याने पुन्हा फोन केला असता त्यांनी तो नंबरच ब्लॉक लिस्टमध्ये टाकला. एवढ्यावरच न थांबता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी “या संदर्भात कुठलीही माहिती माझ्यापर्यंत नाही; मात्र चौकशी करून पुढील कारवाई करू” असे विदर्भ लाईव्हशी बोलताना स्पष्ट केले. सकाळी १२ वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी ५.३० पर्यंत सुरू होती. पत्रकारांना सुरुवातीला प्रतिक्रिया देण्याचे आश्वासन देऊन नंतर मागे हटणे, चुकीचे नाव सांगणे, दुकानमालकावर कोणतीही कारवाई न करणे हे सगळे प्रकार पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतात. “सांपही मेला आणि काठीही तुटली नाही” अशीच पोलिसांची भूमिका होती, असं म्हणावं लागेल.
या कारवाईत पोलीस आणि ज्वेलर्स यांच्यात काही “चिरीमिरी” झाली का? असा प्रश्न शहरात उपस्थित केला जात आहे. कारण चोरीचे सोने विकत घेणे हा स्वतःच गुन्हा आहे. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने चोरीचे सोने विकत घेतले असते, तर त्याला लगेच अटक झाली असती. मात्र, तुलसी ज्वेलर्सवर कारवाई न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का? असा संशय निर्माण झाला आहे. “कसली न्यायव्यवस्था आणि कसले कायदे?” असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. चोरीच्या सोन्याचे दागिने विकत घेणाऱ्यावर कारवाईच झाली नाही, तर मग कायद्याचे पालन कोणासाठी? या प्रकरणाचा तपास उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी करून वस्तुस्थिती उघड करावी, अशी मागणी होत आहे.
नशिराबाद पोलिसांची मलकापुर सोने चोरी प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणाले चौकशी करून कारवाही करू
