मलकापूर:- विदर्भाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मलकापूर शहरातील कॉन्ट्रॅक्टवरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. घंटागाडी व कचरागाडीसह आमदार चैनसुख संचेती यांच्या कार्यालयावर त्यांनी भव्य मोर्चा काढला. रखडलेल्या बिलांच्या समस्येमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद करत आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी आरोप केला की पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांच्या मेहनतीचे पैसे वेळेत मिळत नाहीत. या आंदोलनाची दखल घेत आमदार चैनसुख संचेती यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना त्वरित सूचना देत रखडलेले बिले तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले.आमदार संचेती यांच्या हस्तक्षेपामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कामगारांनी त्यांच्या पाठपुराव्याबद्दल आमदारांचे आभार मानले, मात्र पालिका प्रशासनाने भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.सध्या आरोग्य कर्मचारी कामावर परतले असून, शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत होत आहे. प्रशासनानेही या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
रखडलेल्या बिलांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा घंटानाद; आमदार संचेतींच्या मध्यस्थीने कर्मचाऱ्यांना दिलासा
