खामगाव :- सजनपुरी शिवारातील बालाजी पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत निष्काळजी ट्रकचालकाच्या बेजबाबदार वागण्यामुळे एका इसमाचा पाय चक्क ट्रकच्या चाकाखाली चिरडला. या अपघातात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १० मार्च रोजी रात्री १.३० च्या सुमारास घडली. विश्वेश्वर विठ्ठलराव सोनवणे हे त्यांच्या ट्रक (क्रमांक MH-04 GC-2972) च्या बाजूला झोपले असताना अचानक ट्रक सुरू करून हलवण्यात आला. त्यावेळी निष्काळजीपणे ट्रक चालविल्यामुळे सोनवणे यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेले. घटनेनंतर ट्रकचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी ट्रकवरील क्लिनर लुकेश भुजंगराव पाचघरे (वय ३२, रा. तळेगाव शामजीपंत, जि. वर्धा) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, फरार ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.