खामगाव : – अंबोडा नदीपात्रातून विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जलंब पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी 12.30 वाजता खोलखेड माटरगाव चौफुलीवर घडली. ट्रॅक्टर चालक सुरज कैलासिंग राजपूत (वय 33, रा. खोलखेड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना अंबोडा नदीपात्रातून अवैध रेती वाहतुकीची माहिती मिळताच जलंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली. खोलखेड माटरगाव चौफुलीवर ट्रॅक्टरला थांबवून चालकाकडे वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याने नकार दिला.कारवाईत विनाक्रमांकाच्या लाल रंगाच्या ट्रॅक्टरसह दीड ब्रास रेती (किंमत 9 हजार रुपये), ट्रॅक्टर व टाली (किंमत 6 लाख रुपये) असा एकूण 6 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई ठाणेदार अमोल सांगळे, पो. कॉ. गोविंदा होनमाने, पो. कॉ. रितेश मसने यांच्या पथकाने केली. फिर्यादी पो. कॉ. रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून चालक सुरज राजपूतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय श्याम पवार करीत आहेत.
अवैध रेती वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल! जलंब पोलिसांची कारवाई
