बुलढाणा ( दिपक इटणारे ): बुलढाणा जिल्ह्यात मुली बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील एका महिन्याच्या कालावधीत तब्बल ५० मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून या मुली हरवल्याचे स्पष्ट होत असून, काही मुली घरगुती कारणामुळे, काही रागाच्या भरात, तर काही विवाहासंदर्भात घर सोडून गेल्याची नोंद करण्यात आली आहे. एका महिन्याच्या आत इतक्या मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी नक्कीच गंभीर आणि चिंताजनक बाब ठरत आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार मलकापूर शहर व ग्रामीण भागातून ४, अंढेरा २, लोणार २, जळगाव जामोद ३, तामगाव २, खामगाव शहर व ग्रामीण ६, मेहकर ४, पिंपळगाव राजा २, रायपूर २, बोरखेडी २, देऊळगाव राजा १, बुलढाणा शहर व ग्रामीण ५, धामणगाव बढे १, डोणगाव १, सोनाळा १, जलंब १, बीबी १, चिखली २, किनगाव राजा २, हिवरखेड २, शेगाव २ व धाड २ मुली बेपत्ता झाल्या आहेत. या आकडेवारीवरून जवळपास प्रत्येक तालुक्यातून मुली बेपत्ता झाल्याचे दिसून येते. दरमहा जिल्ह्यातून हरवलेल्या मुलांची, विशेषतः मुलींची नोंद वाढत चालली आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत ही परिस्थिती दिसून येत असून, यात सामाजिक, कौटुंबिक तसेच व्यक्तिगत कारणांची गुंतागुंत असल्याचे दिसते. मात्र एका महिन्यात तब्बल ५० मुली बेपत्ता होणे हा आकडा हलक्यात घेण्यासारखा नाही. नुकत्याच समोर आलेल्या घटनांमध्ये काही मुलींनी प्रेमसंबंधातून पळून जाण्याचा मार्ग अवलंबला तर काही मुली घरातील वादामुळे रागाच्या भरात निघून गेल्या. काही प्रकरणांमध्ये मुलींचा विवाह लावण्यात आला असून त्यामुळे त्या हरवल्याच्या नोंदीत आल्या आहेत. तरीसुद्धा सर्वच प्रकरणे स्पष्ट नसून काही बाबी तपासाअंती समोर येत आहेत. मुली हरवण्याचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यातील पालक व समाजात चिंता निर्माण झाली आहे. शाळा-कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींपासून विवाहित महिलांपर्यंत अशी प्रकरणे नोंदली गेली आहेत. दर महिन्याला एवढ्या मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होणे ही बाब पालकांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबाने जागरूक राहणे, त्यांच्याशी सतत संवाद ठेवणे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक ठरत आहे. जिल्हा प्रशासनाकडे नोंद झालेला हा रेकॉर्ड समाजात विचार करायला भाग पाडणारा आहे.